शनिवार 18 फेब्रुवारी 2012

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र.....

आज अचानक हे आठवलं....its close to my heart...!
***********************************************************************************
प्रिय गुरूजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात ; नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही.
स्वार्थी राजकारणी असतात जगात ,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. 
मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव
मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला
पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी…..
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर
डुलणारी चिमुकली फुलं
शाळेत त्याला हा धडा मिळू दे -
फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.
आपल्या कल्पना, आपले विचार
यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा
त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्द्ल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा -
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणा-या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी.
पुढे हे ही सांगा त्याला
ऎकावं जनांचं , अगदी सर्वांचं….
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपटं टाकून
निकष सत्व तेवढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्य मनावर बिंबवा -
हसत राहावं उरातलं दुःख दाबून
पण म्हणावं त्याला
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस.
त्याला शिकवा..
तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
त्याला हे पुरेपुर समजावा की
करावी कमाल कमाई त्याने
ताकद आणि अक्कल विकून….
पण कधीही विक्रय करू नये
हॄदयाचा आणि आत्म्याचा !
धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेने वागवा पण
लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य
पण धरला पाहीजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत रहा त्याला -
आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर.
माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे
खूप काही मागतो आहे….
पण पहा…… जमेल तेवढं अवश्य कराचं.
माझा मुलगा -
भलताच गॊड छोकरा आहे हो तो.
….अब्राहम लिंकन
रूपांतर – वसंत बापट

शुक्रवार 7 ऑक्टोबर 2011

व्हजायनल डूश


जननेंद्रियांची काळजी ह्या धाग्यावर बर्‍याच जणींनी डूशविषयी माहिती विचारली. डूश वापरण्याचं प्रमाण बरंच असल्याने आणि तो वापरणं योग्य नसल्याने, त्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी हा लेख.
डूश ( Douche ) हा फ्रेंच शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ आहे - धुणे किंवा भिजत घालणे.( To wash or to soak )
योनीमार्गात किंवा गुदद्वारात पाणी + औषध घालून स्वच्छ करणे, ह्याला डूशिंग म्हणतात.
प्रामुख्याने योनीमार्गासाठी हा वापरला जातो. ( vaginal douching )
भारतातील स्त्रियांमध्ये फारसा प्रचलित नसला तरी अमेरिकेमध्ये डूश वापरणार्‍या स्त्रियांचं प्रमाण सुमारे ३०-४०% इतकं लक्षणीय आहे.
( भारतातील स्त्रिया ह्या विषयावर फारशी चर्चा करत नसल्याने खरी टक्केवारी काढणं अवघड आहे. पण घरगुती पद्धतीने - म्हणजे पाण्यात डेटॉल / सॅवलॉनचे थेंब टाकून योनीमार्गात सिरिंजच्या सहाय्याने घालणार्‍या स्त्रिया भारतात असताना ओपीडीत बर्‍याचदा पाहिलेल्या आहेत. )
डूशसाठी पाण्यात व्हिनेगर, बेकिंग सोडा, आयोडिन ह्यापैकी काहीही घालून वापरलं जातं. औषधांच्या दुकानात औषध मिसळलेल्या डूश बॅग्जसुद्धा मिळतात.
ही काही उदाहरणे.
douche 2.jpg
betadine_vaginal_douche.jpg
douche 3.jpg
Douche pic 1.jpg
स्त्रिया डूश का वापरतात ?
१. योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी
२. योनीमार्गातून येणारा विशिष्ट वास घालवण्यासाठी
३. पाळीनंतर योनीमार्गातील ' अशुद्ध ' (?) रक्त धुवून काढण्यासाठी
४. गर्भधारणा टाळण्यासाठी
५. लैंगिक संबंधातून पसरणारे जंतुसंसर्ग रोखण्यासाठी.
पण...खरंतर ह्यातील कुठलाही उद्देश डूशमुळे साध्य होत नाही !
ACOG ( American college of Obs. & Gyne.) आणि बाकी बर्‍याच डॉक्टर्सच्या मते डूश वापरणे मुळीच योग्य नाही. उलट ह्याच्या वापराने अपाय होण्याची शक्यता खूप वाढते.
स्त्रियांच्या योनीमार्गात बरेच उपयुक्त बॅक्टेरिया असतात. त्यांच्यामूळे योनीमार्गातील वातावरण अ‍ॅसिडिक राहतं. असं वातावरण जंतूंसाठी पोषक नसल्याने जंतुसंसर्ग रोखण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होते.
डूश वापरल्याने हे उपयुक्त बॅक्टेरिया मारले जातात. योनीमार्गातील pH बॅलन्स बिघडतो. त्यामुळे वेगवेगळे जंतू योनीमार्गात सहजरित्या प्रवेश करू शकतात आणि आपलं बस्तान बसवू शकतात.
डूशच्या वापराने होणारे काही धोके -
१. बॅक्टेरियल व्हजायनोसिस ( BV- Bacterial vaginosis )
२. पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज ( PID )
३. लैंगिक संबंधातून पसरणारे जंतुसंसर्ग ( STD )
४. वंध्यत्व ( जंतुसंसर्ग जर गर्भाशय, फॅलोपिअन ट्युब्जपर्यंत पोहोचल्यास )
५. मुदतपूर्व प्रसूती ( प्रिटर्म डिलीव्हरी )
मग योनीमार्ग स्वच्छ कसा ठेवायचा ?
Just leave it alone !! निसर्गाने योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी आधीच तरतूद केलेली आहे. आपण त्यात ढवळाढवळ करणं योग्य नाही.
बाह्यांगाच्या स्वच्छतेसाठी जननेंद्रियांची काळजी हे पहा.
आणि तुम्हाला नेहमीपेक्षा खूप जास्त स्त्राव, दुर्गंध, कंड वाटत असेल तर सरळ डॉक्टर गाठा !

जननेंद्रियांची काळजी

संकोचामुळे किंवा " त्यात काय आहे चर्चा करण्यासारखं ?" ह्या भावनेमुळे थोडासा दुर्लक्ष झालेला, पण अत्यंत महत्वाचा विषय आज तुमच्यासमोर मांडत आहे.
आमच्या ओपीडीत येणार्‍या पेशंटस् ची एक ढोबळ वर्गवारी केली तर त्यामध्ये ---
१. प्रेग्नंट स्त्रिया,
२. पॉलिसिस्टिक ओव्हरी आणि त्यामुळे होणारे त्रास असलेल्या स्त्रिया, आणि
३. वरचेवर लघवी किंवा योनीमार्गामध्ये जंतुसंसर्ग झालेल्या स्त्रिया
असे तीन गट प्रामुख्याने आढळतात.
त्यातल्या तिसर्‍या गटाविषयी हा लेख.
स्त्रीची जननेंद्रियांना त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका काहीसा जास्त असतो.
उदा. - योनीमार्ग आणि लघवीचे ओपनिंग जवळ असणे.
- योनीमार्ग आणि अ‍ॅनस - म्हणजे गुदद्वार ह्यांच्यातही फार अंतर नसणे.
ह्या रचनेमुळे ह्या तीन मार्गांमधले जंतुसंसर्ग एकमेकांत सहज पसरू शकतात.
vulva.jpg
पण.......असं वारंवार होऊ नये म्हणून निसर्गाने इथे एक संरक्षणयंत्रणा बसवलेली आहे.
योनीमार्गात काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया ( उदा. - लॅक्टोबॅसिलस ) निसर्गाने दिले आहेत. ह्या बॅक्टेरियांमुळे योनीमार्गातील वातावरण अ‍ॅसिडिक राहतं....आणि असं वातावरण जंतूंना मारक असतं !
( मात्र हेच वातावरण शुक्राणूंना मात्र अपाय करत नाही !)
मग असं असूनही वारंवार जंतुसंसर्ग का होतो ??
ह्याचं कारण...आपण चुकीच्या सवयी आणि समजूतींमुळे निसर्गाच्या ह्या संरक्षणयंत्रणेचा बोर्‍या वाजवतो !
विश्वास नाही बसत ??
जवळजवळ प्रत्येक मुलीला तिची आई शिकवते,
" लघवीची जागा दिवसातून कमीतकमी दोन वेळा साबण- बिबण लावून स्वच्छ धूत जा."
आणि आईने सांगितलेल्या बाकीच्या गोष्टींकडे सोयीस्करपणे कानाडोळा करणारी मुलगी ही एक गोष्ट मात्र अगदी तंतोतंत पाळते.
खरंतर साबण अल्कलाईन असतो....योनीमार्गाच्या अ‍ॅसिडिक वातावरणाला अतिशय हानीकारक !
साबणाच्या अतिरिक्त वापराने योनीमार्गातील दोस्त-बॅक्टेरिया मरतात आणि बाहेरच्या शत्रू-बॅक्टेरियांना आत घुसायला संधी मिळते.
एकदा हे जंतू आत घुसले की मग खाज सुटणे, पांढरं पाणी जाणे ह्यासोबतच पेल्व्हिक इन्फ्लमेटरी डिसीज
(PID), त्यातून आलेलं वंध्यत्व, सर्व्हायकल कॅन्सर यासारखे गंभीर आजारही होऊ शकतात.
vagina.jpg
काही गोष्टी लक्षात ठेवल्या आणि सवयीच्या करून घेतल्या तर ह्या वारंवार होणार्‍या जंतुसंसर्गाला आपण नक्कीच आळा घालू शकतो.
१. जननेंद्रियांची स्वच्छता करताना नेहमी वरून खाली ह्या पद्धतीने करा. म्हणजेच योनीमार्गाच्या वरील फुगीर भागापासून ( pubic area ) चालू करून मग खाली गुदद्वाराजवळचा भाग स्वच्छ करा.
२. शौचानंतर पाण्याने धुताना ( किंवा पेपर टॉवेल वापरताना) नेहमी पुढून मागे असंच करा. ह्याच्या उलट्या दिशेने केल्यास शौचामधले बॅक्टेरिया योनीमार्गात घुसू शकतात.
( आपली आतडी आणि शौचामध्येसुद्धा काही रहिवासी बॅक्टेरिया असतात.पण तेच जर दुसर्‍या भागात शिरले तर अत्यंत गंभीर आजाराला कारणीभूत होतात.)
३. प्रत्येकवेळी लघवीनंतर जननेंद्रिये साबण लावून धुवू नका. नुसत्या पाण्याने धुवा किंवा टिश्यूने कोरडी करा.
४. आंघोळीच्या वेळीसुद्धा योनीमार्ग धुवू नका !
(योनीमार्ग म्हणजे आतला भाग.) फक्त बाह्यांगाची स्वच्छता करा. त्यासाठी सौम्य साबण थोड्या प्रमाणात वापरा.
५. ह्या जागी स्पाँज / लुफा काहीही वापरू नका. त्यामुळे होणार्‍या सूक्ष्म जखमांमधून ( Micro-abrasions ) जंतू आत शिरू शकतात.
६. योनीमार्गाची ( आतल्या भागाची ) स्वच्छता करण्यासाठी डूशचा वापर करू नका !
बर्‍याच स्त्रिया डॉक्टरकडे जाताना, संबंधाच्या आधी, किंवा इतर वेळीसुद्धा अस्वच्छ वाटतं म्हणून डूशचा वापर करतात. ही खूप घातक सवय आहे.
डूश वापरल्यामुळे योनीमार्गातील उपयोगी बॅक्टेरियांची हानी होऊन pH बॅलन्स बिघडतो.
डॉक्टरकडे जाताना तर मुळीच वापरू नका.
( आम्हाला बर्‍याचदा हा अनुभव येतो.
स्त्रिया अगदी कळवळून सांगत असतात, " डॉक्टर, खूप वाईट खाज सुटतेय, दुर्गंध येतोय, पाणीसुद्धा जातंय."
पण तपासणीमध्ये तर योनीमार्ग अगदी स्वच्छ दिसतो.
शेवटी शंका येऊन विचारलं जातं," हे बघ. आत्ता सध्या तरी कसलंच इन्फेक्शन दिसत नाही.....तू डूश वगैरे वापरला नाहीयेस ना ?"
मग ती स्त्री सांगते, " डॉक्टर, तुमच्यापुढे असं अस्वच्छ कसं यायचं ? म्हणून मी डूश वापरला."
अशा परिस्थितीत कुठला जंतुसंसर्ग झाला आहे हे ओळखणं आणि त्यावर उपचार करणं अगदी अशक्य होऊन बसतं ! )
७. जननेंद्रिये धुतल्यानंतर कोरडी ठेवा. ओलसरपणा तसाच राहिला तर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
ह्यासाठी स्वच्छ, कोरडे टॉवेल्स वापरा. आपला टॉवेल दुसर्‍यांना वापरू देऊ नका. ( आणि अर्थातच दुसर्‍यांचा तुम्ही वापरू नका.)
८. पोहून आल्यानंतर ओल्या कपड्यांनी फार वेळ बसू नका.
९. इतर कुठलीही वस्तू, सेक्स टॉईज योनीमार्गात घालणे टाळा.
१०. शक्यतो मऊ, सुती अंतर्वस्त्रे वापरा. सिन्थेटिक अंतर्वस्त्रांमुळे आपली त्वचा व्यवस्थित श्वासोच्छवास करू शकत नाही. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो.
११. पाळीच्या वेळी सॅनिटरी पॅड प्रत्येक ३-४ तासांनी ( किंवा गरजेनुसार त्याहून जास्त वेळा ) बदला.
टॅम्पून्स ६-८ तासांपेक्षा जास्त योनीमार्गात ठेवू नका.
१२. पाळीच्या वेळी पोहायला जायचे टाळा.
१३. पाळीच्या वेळी शारीरिक संबंध टाळा. अन्यथा जंतुसंसर्गासोबतच, एन्डोमेट्रिऑसिस सारख्या आजारांचाही धोका असतो.
१४. संबंधानंतर लगेचच जननेंद्रिये पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचं आहे. तसेच संबंधानंतर लघवी रोखून ठेवल्याने जंतुसंसर्गाचा धोका कैक पटीने वाढतो. त्यामुळे असं करणं टाळा.
१५. सगळी काळजी घेऊनही जंतुसंसर्ग झालाच तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योनीमार्गात ठेवायची औषधे घ्या. ह्या औषधांचा कोर्स पूर्ण करणे खूप आवश्यक आहे.
( कुठलेही बॅक्टेरिया, व्हायरसेस ह्यांच्यामध्ये रेसिस्टन्स तयार करण्याची शक्ती असते. म्हणजेच एखाद्या औषधाविरुद्ध हे जंतू त्यांच्या रचनेमध्ये काही जेनेटिक बदल घडवून आणू शकतात. ह्या बदलांमुळे तेच औषध पुन्हा वापरल्यास त्या जंतुंना मारू शकत नाही.)
१६. सगळया गोष्टी पाळूनही जर वारंवार जंतुसंसर्ग होत असेल तर रक्तातील साखर तपासून घ्या. बर्‍याच स्त्रियांमध्ये अशावेळी पहिल्यांदा मधुमेहाचं निदान होतं !
१७. योनीमार्ग आतून मऊ आणि ओलसर रहावा म्हणून काहीप्रमाणात स्त्राव येत असतात. शिवाय शरीरातील इस्ट्रोजेनच्या पातळीनुसार हा स्त्राव महिन्याच्या चक्रात कमीअधिक होत असतो. बर्‍याचदा शारीरिक किंवा मानसिक ताण पडला तरी हा स्त्राव नेहमीपेक्षा जास्त येऊ शकतो.
हे नैसर्गिक आहे. ह्यावर उपचाराची गरज नाही ! विनाकारण औषधांचा मारा करू नये. पण जर हा स्त्राव जास्त प्रमाणात असेल, खाज सुटत असेल, त्याचा रंग पिवळा किंवा हिरवा असेल तर उपचारांची गरज असते.
जननेंद्रियांचे आरोग्य हे स्त्रीच्या आरोग्याचा अविभाज्य भाग आहे. साध्या-सोप्या पण अतिमहत्वाच्या गोष्टींपासून आरोग्याच्या मार्गावर वाटचाल करूया.
आधीपासून करत असाल तर अगदी उत्तम.....नसाल तर...शुभस्य शीघ्रम् !

रविवार 29 मे 2011

वपु- भाग ३ (अंतिम)

२६/०६/२००१
आज सकाळी उठतानाच आठवलं होतं, '२६ तारीख आहे. बापू पुण्याहून येतील आज.'
क्लिनिकवरून आल्यावर बाकीच्या सख्या टी.व्ही.रूममध्ये घुसल्या. मी बापूंना फोन करायला कॉईन बॉक्स गाठला.
फोन लावला. " हॅलो" ऐकूनच खरंतर मी बापूंचा आवाज ओळखला होता. तरीपण विचारलं,
" हॅलो, वपु आहेत का?"
"बोलतोय."
( मला उगीचच हा संवाद फार आवडतो.)
मी म्हटलं, " बापू, मी मनू बोलतेय. जे.जे. हॉस्पिटलमधून. सई आणि मनू मधली मनू.
ओळखलंत का आता ?"
बापू एकदम खळखळून हसले.
"नाही बुवा.अजूनही नाही ओळखलं मी." पूर्णपणे चेष्टेचा सूर.
" काय हो बापू, मला दरवेळी एवढं सगळं सांगायचा कंटाळा आलाय आता. आपण माझी आयडेन्टिटी म्हणून एक वेगळं नाव फिक्स करूया."
बापू- "अगं, मनू माझ्या नातीचं पण नाव आहे ना. नावाचा गोंधळ होतो.आवाजावरून नाही ओळखता येत आता. म्हातारा झालो ना."
बापूंच्या मगाच्या हसण्यावर मी खूष होते.
मग भरपूर गप्पा नेहमीसारख्याच. परवाच्या पेपरमध्ये प्रवीण दवणेंच्या लेखात त्यांचं नाव वाचलं तेव्हा खूप आठवण आली होती त्यांची. ते सांगितलं त्यांना.
मध्येच मी म्हटलं, " बापू, खूप कंटाळा आलाय हो. टेन्शन पण आलंय अभ्यासाचं."
"ये इकडे."
"कधी?"
"आत्ता. नीघ लगेच."
त्यांच्या असल्या एका शब्दाच्या आग्रहाची आम्हाला नेहमी गंमत वाटते.
"बापू, आत्ता कशी येणार ? उशीर होईल. "
"मग उद्या ये."
"किती वाजता येऊ उद्या?"
"संध्याकाळी ये. ५-५:३० ला."
सईची टर्म एक्झाम चालू होती.
"मी एकटीच येईन बापू. सईची परीक्षा सुरू आहे."
"कसली?"
"टर्म एक्झाम."
आज बापूंनी 'कसली एक्झाम' म्हणून कसं काय विचारलं?
असली चौकशी ते कधीच करत नाहीत.
खूप मस्त गप्पा चालल्या होत्या आज.
"बरं बापू, ठेवते आता."
"बरं ये उद्या नक्की.गुडनाईट. "
रात्री सईला सांगितलं. तिलाही यायची इच्छा होतीच, पण परीक्षा चालू असल्याने तिने मोठ्ठ्या ' उदार अंतःकरणाने ' मला एकटीला जायची परवानगी दिली !
'मीरा सूर कबीरा'ची कॅसेट आणली आहे बापूंसाठी. आवडेल त्यांना फार. मीरेची भजनं...लताच्या आवाजात. म्हणजे मेजवानीच.
खूप गप्पा मारायच्या उद्या. लेन्स-केस सोबत घेऊन जायला हवं. गप्पांमध्ये उशीर झाला तर बापू आणि डॉक्टर रात्रीचे मला एकटीला पाठवणार नाहीत.
जर राहिलेच तिकडे तर बापूंना मी 'कळत-नकळत' ची सीडी लावायला सांगणार आहे. आणि उरलेले फोटो पण बघायचे.
सईला टुकटुक !
********************************************************************************************
vapu2_0.jpg
२८/०६/२००१
' कणभर चुकीलाही आभाळाएवढी सजा असते
चूक आणि शिक्षा ह्यांची ताळेबंदी मांडायची नसते.'
...........ताळेबंदी मांडायची नाही ? ठीक आहे. पण हातातून जे निसटलंय.....तेही अगदी कायमसाठी, त्याच्या वेदना कशा कमी होणार ?
बापू, आपलं ठरलं होतं ना हो परवा फोन वर? तुम्ही मला म्हणाला होता, " तू ये उद्या नक्की. "
मी शब्द पाळला. मी आले होते. तुम्ही का असं केलंत पण? शब्द देऊन, भेटायचं ठरवून असे न सांगता-सवरता कुठे निघून गेलात? तेही इतकं अचानक?
तुम्हाला तुमच्या वसुंधरेला भेटायचं असेल, ज्यांचं 'जाणं' तुम्ही सोसलंत अशा १७८ माणसांच्या भेटीची ओढ लागली असेल ना !
"जाणार कवातरी पटदिशी."
बोललात आणि गेलात. 'पार्टनर' प्रमाणे तुम्ही खरंच अगदी शेवटपर्यंत 'पल्स' पेक्षा 'इम्पल्स' वर जगलात आणि गेलातही तसेच. आजारी पडणं नाही, अंथरूणावर खिळणं नाही.
इम्पल्सप्रमाणे जगण्याची हिंमत तुमचीच. आम्ही अजूनही 'लोक काय म्हणतील?' च्या चक्रव्यूहात अडकणारे. परवा फोनवर तुम्ही " आत्ता ये. निघ लगेच." म्हटल्यावर यायला हवं होतं मी. उशीर झाला तरी मी तिकडे राहू शकते, हे माहीत होतं ना मला. का विचार केला मी ? का नाही आले तिकडे लगेच?
.........बापू, तुमच्या दोन चिमण्या आता कुणापुढे चिवचिवतील ?
*******************************************************************************************
३०/०६/२००१
कुठल्या क्षणाचा भरवसा धरायचा माणसाने ? कशाची शाश्वती धरायची ?
मृत्यू खरंच इतका मोठा खेळिया आहे का ? पाऊलही न वाजवता आला आणि " ११,झपूर्झा " चे चैतन्य घेऊन गेला.
..........मागे उरलाय फक्त रिकामा देव्हारा !
१५ दिवसांपूर्वीच तर त्या मंदिरात राहून आलो होतो आम्ही. आयुष्यभर उमेद देतील असे असंख्य हळवे क्षण ओंजळीत भरून घेऊन आलो होतो. एका माणूसवेड्या पार्टनरच्या 'रंगपंचमी' तले थोडेफार रंग आमच्याही आयुष्यावर उडवून घेतले होते.
........आणि परवा मी पुन्हा तिथेच. तोच रस्ता, तोच जिना, तेच दार, सगळ्या वस्तूही त्याच.
पण सगळंच कसं सुनं-सुनं वाटत होतं.
१५ दिवसांपूर्वी गेलो तेव्हा आम्ही ५ च माणसं होतो. परवा खूप गर्दी. खूप माणसं.पण सगळीच कावरीबावरी. कुणालातरी शोधून शोधून दमलेली.
तुम्ही कुठेच नव्हता !
' ११,झपूर्झा ' त बापू नाहीत, ही गोष्टच किती टोचणारी आहे !
दरवेळी बेल वाजवल्यावर दार उघडेपर्यंतची जी उत्सुकता असते, ती ह्यावेळेस अनुभवायलाच नाही मिळाली.....दार पूर्ण उघडं होतं.
आत पाऊल टाकलं. नेहमीसारखे हळूहळू पावलं टाकत आतून बाहेरच्या खोलीत येत " या " म्हणणारे बापू दिसलेच नाहीत.........त्याऐवजी समोर बापूंचा फोटो. हार घातलेला.
मागच्याच भेटीत बोललेलं ' भिंतीवर फोटो बघण्याचं ' वाक्य एवढ्या लवकर खरं करून दाखवायची काय गरज होती ?
बापूंच्या लाडक्या टीपॉयचे ३ पार्टस गायब होते. एकाच पार्टवर फोटो.
तुमच्या आवडत्या सेटीवर मी बसले. काय चालू आहे हे सगळं ?
ज्या हॉलमध्ये बापूंशी गप्पा मारल्या त्याच हॉलमध्ये त्यांच्याऐवजी त्यांचा फोटो ?
ज्या जागेवर डोळे मिटून ध्यान करणार्‍या बापूंना पाहिलं, तीच जागा रिकामी ?
" Author's chair....you are not authorised !"
बापूंची खुर्ची खरंच खूप पोरकी दिसत होती !
त्या हॉलमध्ये ऐकलेली बापूंची वाक्यं आठवत होती.
" आदर्श फसवे असतात. ते तुम्हाला फरफटत नेतात."
" मैत्रिणी व्हा चांगल्या."
' वाट पहाणारे दार ' वाचायला सांगितल्यावर- " नको मला त्रास होतो."
" अरे हे काय? मला वाटलं तुम्ही सगळं बनवून ठेवलं असेल."
" काल माझ्या शुगरने थैमान घातलं होतं. मग? मग काय, एक आंबा खाल्ला. खाली जाऊन दुकानातून चॉकलेटस् आणली. बस्स !"
सगळं सगळं आठवत होतं.
मध्येच टी.व्ही.वर बातम्यांमध्ये तुमचं नाव ऐकलं. करंट लागल्याप्रमाणे सगळे आत धावलो.
बापूंची माहिती सांगत होते. मध्येच कॅमेरा बापूंवर.
डॉक्टरांनी कचर्‍याचा डब्बा ( अंहं...'के ची टो' !) द्यायला दार उघडलं तर दचकून जागे होणारे बापू इतक्या गर्दीतही एवढे गाढ झोपलेले कसे ? ते हार, ती फुलं... नकळत एक हुंदका फुटला. खोलीतले सगळेच डोळे भरलेले...माझा हुंदका ऐकून सगळ्यांचेच हात डोळ्यांकडे !
ह्याच खोलीत बापूंसोबत बसून 'झनक झनक पायल बाजे' बघितला होता. लता-किशोर-मुकेशची गाणी ऐकली होती. " रामदासी हो " हा सल्लाही मुकाट्याने ऐकून घेतला होता. बापूंच्या बालिश हट्टामुळे ऑम्लेटही इथेच खाल्लं होतं.
आणि " थांब थांब जरा. नुसती खटाखट बटणं दाबत सुटलीयेस." असं म्हणत सगळी बटणं बंद करून पुन्हा रिमोटने लाईट-फॅन चालू करणार्‍या बापूंशी गप्पाही मारल्या होत्या.
स्वातीने रिमोट कुठे दिसेना म्हणून डायरेक्ट बटण दाबून टी.व्ही. बंद केला, तेव्हा मला खरंच तिला थांबवावंसं वाटलं,
" अगं थांब स्वाती, आपल्या बापूंना आवडत नाही ना बटणांना हात लावलेला."
जेमतेम ३-४ वेळा बापूंना भेटलेय तर ही अवस्था माझी. स्वाती-सुहासचं काय होत असेल ?
" तुमच्या हातची चटणी नसती तर मी जेवलोच नसतो."
ह्या एका वाक्याच्या चिठ्ठीतून बापूंवरचं प्रेम व्यक्त करणारा सुहास.....काय झालं असेल त्याचं ? कसा पेलवेल त्याला हा धक्का ? की तेवढी ताकद देऊन गेले असतील बापू त्याला ?
बापूंनी गेल्यावेळी हार्मोनियमवर वाजवलेलं गाणं.खूप छळत होते ते रेंगाळणारे सूर. हार्मोनियम वाजवतानाची कापरी बोटं, डोळे मिटून गाणं म्हणतानाचा व्याकूळ भाव....
बापूंचं हार्मोनियम दुरुस्त करायला जाणार होतो आम्ही सगळे. खूप गोष्टी राहून गेल्या. जीवाला चुटपुट लाऊन गेल्या !
आजवर बर्‍याचदा ऐकलं होतं, " कालच भेटले मला आणि आज हे असं."
" चुकूनही वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून. जायच्या आधी सगळ्यांना भेटून आले ते."
मला नेहमी वाटायचं, असं कसं होईल? एवढे योगायोग घडतात का ? की अतिदु:खाने हळवं झाल्याने माणसं असं बोलत असतील ? .......आज अनुभव आला मला. नाहीतर बापू पुण्याहून आलेल्या दिवशीच फोन करायची काय बुद्धी सुचावी मला? बापूसुद्धा खास मुला-नातवंडांना भेटून येण्यासाठीच पुण्याला जाऊन आले असतील का?
"११,झपूर्झातून वसुंधरा गेली. मीही तिथूनच जाणार." Strong willpower!
एक दिवस आधी जर मृत्यूने घाला घातला असता तर बापूंची मनापासूनची इच्छा अपुरी राहिली असती.
गेल्यावेळी बापूंना भेटून आले तेव्हा आल्यावर कागदावर एक कविता उतरली होती.....पण अर्धीच राहिली होती.
" कशासाठी कुणासाठी
मन आज हुरहुरे ?
आर्त पापण्यांच्या काठी
घन आसवांचा झरे !
लाही लाही जीव झाला
सावलीला आसावते,
हात पसरून दोन्ही
एक घर बोलावते !
'घर' कशी म्हणू त्याला
'देवघर' विसाव्याचे,
भोळ्या भक्तांसाठी कान्हा
सूर घुमवी पाव्याचे !
जगावेगळा कन्हैय्या
जगावेगळी बासरी,
त्याला वेड माणसांचे
गाणे प्रेमाचे अंतरी !"
लिहून झाल्यावर मी जेव्हा कविता पुन्हा वाचली, तेव्हा मलाच कळलं नव्हतं की पहिलं कडवं मी असं का लिहिलंय.
बापूंना भेटून आल्यावर आम्ही कित्ती खूष असतो. मग असं का लिहिलं गेलं असेल?
पुढे काहीतरी हातातून निसटणार आहे ही कल्पना तेव्हा नव्हती. त्यामुळे मला फारच विचित्र वाटलं होतं.
......आता वाटतंय....intuition हयालाच म्हणतात का ?
********************************************************************************************
०४/०७/२००१
'बापु गेलेत' हे अजूनही खरंच वाटत नाही.
अजूनही कोणाजवळ त्यांच्याबद्दल बोलताना वर्तमानकाळातच उल्लेख केला जातो.
"अरे, वपु ना ? एकदम सही आहेत ते. जसे त्यांच्या पुस्तकांतून दिसतात तस्सेच !"
....बोलून गेल्यावर जाणवतं, मी काय बोलले ते. माझंच बोलणं मग मनात चरचरत रहातं. आणि डोळ्यांत पाणी साठतं !
असं वाटतं बापूंनी आपली मजा केली असेल. आज-उद्या त्यांचं पत्र मिळेल---
" प्रियेस्ट सई आणि मनू, कशी गंमत केली ? हॉ हॉ हॉ ! रडलात का खूप ?
काही बिघडत नाही. रडणं हा एक चांगला व्यायाम आहे. चला तर, खूप दिवसांत आला नाहीत इकडे. निघा लगेच."
.....आणि मग मी गेल्यावर उगीचच त्यांच्याशी भांडेल.
"बापू,ही कसली चेष्टा ? नाही आवडली आम्हाला."
......हम्म्म. खरंच असं झालं असतं तर ?


vapu3.jpg

वपु- भाग २

०९/०६/२००१
काल दिवसभर खूप धावपळ. क्लिनिकमध्ये केस प्रेझेण्टेशन. सगळ्या गोंधळात दुपारचं जेवण संध्या. ५:३० ला.
६:३० वाजता मी आणि सई बापूंकडे जायला निघालो. (वपुंना त्यांच्या जवळचे लोक 'बापू' म्हणतात. आम्ही कधी 'बापू' म्हणायला लागलो कळलं सुद्धा नाही.)
२५ मार्चला बापूंच्या वाढदिवसानिमित्त दादर-माटुंगा सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर मध्ये बापूंची भेटच नाही. फोन वर जरी बोललं तरी बरं वाटतं. पण बरेच दिवस झाले फोन सुद्धा लागत नाहीये.आम्ही जाम घाबरलो होतो. अर्थात माझं मन सांगत होतं की बापू एकतर स्वाती-सुहासकडे गेले असतील किंवा मग फोन खराब असेल.
झपूर्झा...बेल वाजवली. जोशीकाकांनी दार उघडलं. आत शिरलो. बापू आतल्या खोलीतून बाहेर येत होते.
"या."
त्यांच्यासाठी घेतलेली फुलं त्यांना दिली. एक माझी निवड. एक सईची.
"बापू, कुठलं आवडलं ?"
" दोन्हींत कोणतं फूल छान आहे हे ठरवणं, खरंच अशक्य आहे."
बापूंनी आमचं संभाव्य भांडण तिथेच मिटवून टाकलं.
" खूप दिवसांनी आलात." डोळे ओले.
खरंच 'म्हातारपणी धरण फुटायला एखादंच छिद्रही पुरत असावं.'
"बापू, आम्ही किती घाबरलो होतो. फोन का लागत नव्हता?"
"नंबर बदलला. घाबरला होतात ते 'आता गेल्यावर भिंतीवरच फोटो दिसेल' म्हणून का?"
बापू खुषीत होते. ह.मो.मराठेंच्या भाषेत सांगायचे तर- ' वपुंची आतषबाजी सुरू झाली होती. वेळ मजेत जाणार तर.'
तेवढ्यात समीर म्हणून एक अमराठी माणूस आला. त्याने बापूंचं 'नको जन्म देऊ आई' आणलं होतं. बापूंनी स्वतः त्या कविता वाचून दाखवल्या.
समीरसाठी त्या कविता इंग्लिशमधून ट्रान्सलेट करून सांगितल्या.
समीरच्या मैत्रिणीला वाचनाची आवड आहे. तिला खूपच बरं नव्हतं.तिनेच त्याला बापूंकडे पाठवलं होतं. ती स्वतः कधीच बापूंशी बोलली नव्हती.
बापूंनी समीरकडून नंबर घेऊन तिला फोन लावला. तिच्याशी आणि तिच्या आईवडिलांशी बोलले.
कुणी सांगूनही विश्वास बसला नसता की बापू त्या सगळ्यांशी पहिल्यांदा बोलत होते. He is simply great !
संवादाचं मस्त कसब आहे त्यांच्याकडे.
सगळेजण पाणीपुरी खाऊन आलो.
गप्पा मारताना बापू मध्येच म्हणाले, " आज नातीला पहावंसं वाटतंय, लहानपणीच्या रूपात. 'कळत-नकळत' ची सीडी मागवलीये."
आणि अगदी स्पोन्टॅनियसली विचारलं, " कंपनी देणार? "
I was really shocked !
कारण तिकडे जातानाच ट्रेनमध्ये मी सईला म्हणाले होते, " मला बापूंसोबत दिवसभर राहून त्यांची दिनचर्या पहायची आहे गं. त्यांचा स्वभाव जवळून अनुभवायचाय."
दहावीचा रिझल्ट लागल्यावर मी स्वाध्यायच्या दादांना ( पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले ) भेटून आले, तेव्हा मी किती दिवस आईचं डोकं खाल्लं होतं, मला एक दिवसतरी दादा आणि दिदींसोबत रहायचंय म्हणून.
अशा मोठ्या लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टी जवळून निरखायची ओढ कायम असते माझ्या मनात.
पण ती इच्छा अशी पुरी होईल असं वाटलं नव्हतं.
होस्टेलवर फोन करून सांगितलं.
डॉ.जोशी आल्या. बांदरा वेस्टला त्या गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून काम करतात.
आल्या आल्या बापूंनी चुगली केली, "डॉक्टर, ह्या दोघी तुम्हाला घाबरतात."
डॉक्टर- " का गं, viva घेते म्हणून का? "
( पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला डायबिटिसवर ए टू झेड सगळं विचारून उलटंपालटं घुमवलं होतं !)
त्या पण मस्त आहेत. बापूंबरोबरची माणसं साधी असणं अर्थात शक्यच नाही. त्यांची तत्वं आणि त्यावरची त्यांची स्वतःची श्रद्धा. सहीच !
एक खूपच अशक्य वाटणारी गोष्ट झाली आज.
' मी ऑम्लेट खाल्लं --अंड्याचं.'
For the first & hopefully last time.
(देवा, प्लीज नवरोबाच्या घरचे सगळे वेजिटेरियन असू देत. मला अगदी मनापासून न आवडणार्‍या गोष्टी आहेत ह्या. नॉन्-व्हेज, स्मोकिंग, अल्कोहोल....आणि चहा !)
माझ्या महान 'न-आवडी' ऐकून बापूंचा शेरा- " चहा पीत नाहीस, अंडं खात नाहीस. सरळ रामदासी का नाही होत ?"
हम्म्म. काय बोलणार ?
डॉ़क्टर दमून आल्या होत्या. त्या म्हातार्‍या-कोतार्‍यांना स्वयंपाकाचा ताण देण्यात अर्थच नव्हता. आणि त्यांनी मला उपाशी राहू दिलं नसतं. त्यातून बापूंचं इतकं लहान मुलासारखं चाललं होतं- "सई, आज आपण हिला अंड्याची चव काय असते दाखवू. ए मनू, पण गरम-गरम खाण्यातच मज्जा आहे. गार करून तुला चव कळणार नाही."
इतका गोंधळ चालला होता त्यांचा. त्यांच्या निरागसतेकडे पाहून मला इतकी गंमत वाटत होती. शेवटी मी ते उचललं. मनाचा हिय्या करू पहिला घास घेतला. कसंबसं एक सॅण्डविच संपवलं. मला रात्रभर आणि दुसर्‍या दिवशीही मळमळल्यासारखं वाटत होतं......
सईने एकच कप चहा प्यायला लावला, बापूंनी एकच ऑम्लेट सॅण्डविच खायला लावलं...आता भावी नवरोबांनी चिकन-मटन खायला लावू नये, म्हणजे मिळवलं !
ह्या सगळ्या व्यक्ती माझ्या एक्स्ट्रीम आवडत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रीम नावडत्या !
'कळत-नकळत' आणि 'झनक झनक पायल बाजे'. दोन सीडी मागवल्या होत्या बापूंनी. आधी झनक झनक लावला. बापूंच्या वडिलांचं नेपथ्य. अप्रतिम पिक्चर ! खरंतर आमच्या पिढीने ते संध्याचं मान वेळावणं, बाकीच्यांचे आम्हाला नाटकी वाटणारे संवाद, हे सगळं पहायचं म्हणजे एरवी अशक्यच.
पण हा पिक्चर मात्र खरंच आवडला.
चित्रकला (नेपथ्य), नृत्य, लताचा आवाज आणि तो तबला.....simply marvellous !
आठ दिग्गज कलाकारांनी ह्यात वाद्यं वाजवली आहेत. हरिप्रसाद चौरासिया, बिस्मिल्लां खां, शिवकुमार, अल्लारखां हे त्यातले काही. तो तबला ऐकताना तर अक्षरशः वेड लागत होतं. शेवटचं 'शिवतांडवनृत्य' तर अप्रतिम !
आज बापूंनी दाखवला नसता तर एवढा छान पिक्चर बघायचा राहून गेला असता. ऑडिओ कॅसेट तरी घ्यायलाच हवी आहे सध्या. व्हीसीडी.....बडी होने के बाद !
बापू आणि डॉक्टर दोघेही त्यातले जाणकार. अगदी रंगून गेले होते.
बापू फोनवर कोणाशी तरी बोलताना म्हणालेच होते, " Today I am the happiest man in the world. अण्णांची कॅसेट पाहणार आहे आज."
वडिलांबद्दलचा अभिमान त्यांच्या चेहर्‍यावरून अगदी ओसंडून वाहत होता.
पहाटे २:३० वाजता पिक्चर संपला. बापू झोपायला निघाले. आम्हाला आतल्या एका खोलीत झोपायसाठी तयारी करून दिली. आम्ही कसल्या झोपतोय ?
निवांतपणे नाईट लॅम्पच्या प्रकाशात पुस्तकं वाचत बसलो.
सईच्या हातात ' नजराणा '. माझ्या हातात ' का रे भुललासी '.
फारतर दीड-दोन तास झोपलो असू. सकाळी ६:३० लाच जाग आली. स्लायडिंग विंडोजमधून बाहेरचा पाऊस आणि त्यात निथळणारी झाडे दिसत होती.काचा थोड्याशा बाजूला सरकवल्या.मग तर पावसाचा आवाज आणि आत घुसणारा गारवा.....वेड वाढायला आणखी काय पाहिजे ?
८-८:३० ला बापू आत आले.आम्ही निवांतपणे गप्पा मारत बसलो होतो.
बापूंनी विचारलं, " अगं, झोपलाच नाहीत का तुम्ही ? कमाल आहे तुमची !"
येऊन त्यांच्या इझी-चेअरवर बसले. एक मस्त कॅसेट टाकली.
खूप सही गाणी सगळी.
'उठाये जा उनके सितम'
'वो चांद खिला'
'किसीकी मुस्कुराहटोंपे'
'सबकुछ सीखा हम ने'
'कुछ तो लोग कहेंगे'
एक से एक !
आम्हाला कॅसेट लावून दिली आणि ते परत गेले झोपायला.
खूप छान वाटत होतं.सगळं स्वप्नवत्.
उठलो, आवरलो, पोहे खाल्ले.
....खरंतर चार शब्दांत तो सगळा वेळ मांडता येणं शक्यच नाही. तिथलं प्रत्येक वाक्य मनात खोल खोल उतरत होतं. शिंपलीतल्या मोत्यासारखं साठून राहत होतं !
फोटो पाहिले. एकच बॉक्स पहायला कित्ती वेळ लागला.
खरंच अवलिया माणूस आहे !
रस्त्यांचे, झुंबरांचे, कळस म्हणजे परदेशातल्या एका हॉटेलमधल्या टॉयलेट अ‍ॅक्सेसरीज एकदम हटके होत्या, म्हणून त्यांचेही फोटो काढलेत.
सई म्हटलीच, "बापू, हे क्काय ? टॉयलेटचे काय फोटो काढलेत ?"
बापू मिस्किल हसले. " सौंदर्य आणि कल्पनाशक्ती कुठेही दिसू शकते. त्याला काय कळतंय हे टॉयलेट आहे म्हणून."
स्वातीला दिलेला ' घरचा आहेर '.
बापूंमधल्या 'बापाचं' दर्शन...अत्यंत लोभस, हलवून सोडवणारं.
प्रत्येक फोटोशेजारची कमेंटही सही.
स्वातीच्या वेण्या घालतानाचा एक फोटो आहे. किती भूमिका सांभाळल्या....अंहं, 'जगले' आहेत बापू त्या भूमिकांमध्ये. अगदी जीव ओतून !
त्या दिवशी डोंबिवलीला कार्यक्रम होता. 'चतुरंग प्रतिष्ठान' तर्फे sort of public interview.
मन म्हणत होतं ' जायचं '. बुद्धी थोपवून धरत होती. आदल्या रात्रीचं जागरण, तेही कॉन्टॅक्ट लेन्स डॉळ्यांत ठेऊन, आता इथून जाऊन वॉर्डस अटेंड करायचे......प्रॅक्टिकल गोष्टी स्वप्नांच्या राज्यातून बाहेर खेचत होत्या !
निघालो. स्वत:च्याच घरातून निघाल्यासारखं वाटत होतं.
सकाळी डॉक्टरांनी कॉफी बनवली तेव्हा सई म्हणाली, " अगदी घरी आल्यासारखं वाटतंय."
तेव्हा डॉक्टर हसत म्हणाल्या होत्या, " पहिली वेळ आहे इथे रहायची, म्हणून हातात कप देतेय. पुढच्या वेळेपासून भरपूर कामं करायला लावणार हं मी."
बापुंचा नेहमीसारखा आम्ही जिन्यातुन वळेपर्यंत दारात उभं राहून, हात हलवून दिलेला निरोप आणि मग सगळ्या क्षणांना सेपेरेट करून त्यांना पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करत आमचं त्या कलानगरच्या रस्त्यावरून चालणं !
' आपण खूप उशिरा जन्माला आलो ' आणि ' ठीक आहे, जे मिळतंय ते सुद्धा काही कमी नाही ' हे परस्परविरोधी विचारही नेहमीचेच.
सगळं तसंच. फक्त एक नवीन अवर्णनीय समाधान....' येस्स, बापूंच्या चोपडीत आपलं नाव रजिस्टर झालंय.'
........माणसं जोडण्याची आणि 'शहाण्या' माणसांनाही 'वेडं' करण्याची कला तेवढी शिकवाल का हो बापू आम्हाला ?
**************************************************************************************************

वपु- भाग १

" ज्या मनाला आपण हळवं समजतो, ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते....आणि दुरावलेली व्यक्ती ! सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला काहीच सुचू देत नाही. कोणताही उपदेश उपदंशासारखा वाटतो. भक्तीरस सक्तीसारखा वाटतो. ' बेदम कामात स्वतःला गुंतवून घ्या ' हे सांगणं म्हणजे ' गाडीतलं पेट्रोल संपलंय, हे कुणाला सांगू नका, तसंच प्रवास करा ' असं म्हणण्यासारखं आहे !"
---वपु.
“एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.”
---वपु.
आजवर कित्येक प्रसंगांमध्ये वपुंची वाक्यं आपोआप आठवली आहेत आणि अशा प्रत्येक वेळी मनावर फुंकर घालून गेली आहेत !
वपु आवडणारे लोक जसे अगणित आहेत, तसेच वपु न आवडणारेही काही आहेत.
" अरे, जरा वेगळ्या विषयावर पण लिही. तोच तोच विषय लिहिला की माणसाचा वपु होतो. "
असंही एक वाक्य मागे कानावर आलं होतं. वपुंच्या लिखाणाच्या कक्षा फक्त मध्यमवर्गीयांपुरत्याच मर्यादित राहिल्या, त्यांनी बाकीचे विषय हाताळले नाहीत, असे शेरेही ऐकू येतात.
पण मला काय वाटतं सांगू ?
वपुंनी आयुष्यभर ' माणसा-माणसांतील संवाद ' ह्या विषयावर अमाप लिहिलं. त्यांनी लिहिलेला प्रत्येक प्रसंग अनेकांना आपल्याच बाबतीत घडतोय, इतका जवळचा वाटला. प्रत्येक वाक्य मनात घर करून राहिलं
पण तरीही 'संवाद' अडकण्याचा प्रश्न उरलाच आहे ! आयतं उत्तर समोर आहे, तरी प्रश्न सोडवता येत नाही अशी अवस्था झाली आहे. एवढा मोठ्ठा विषय आहे हा !.....
मी वपुंची भक्त ! माझी स्वतः ची काही नाती, काही मैत्र संवाद अडकल्यामुळे जागच्या जागी गोठून राहिलेत. पुन्हा वाहते व्हावेत अशी इच्छा खूप आहे, पण त्या भिंती पाडायच्या कशा?
आहे का अशी एकतरी व्यक्ती जिने संवाद थांबायचा अनुभव नाही घेतला ? परिघावरच्या सगळ्यांशीच वाहते संवाद असणारी व्यक्ती माझ्यातरी पाहण्यात नाही.
वपुंच्या लिखाणामुळे माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट होते. ' हे असं वाटणारे किंवा अनुभवणारे आपण एकटेच नाहीत, ' ही भावना फार मोठ्ठा दिलासा देऊन जाते !
वपुंना भेटण्याचं माझं स्वप्न कॉलेजात असताना अचानक पुरं झालं. ज्याकाळात त्यांची पुस्तकं झपाटल्यासारखी वाचत होते, ज्याकाळात मनाच्या संवेदना अजून नवथर होत्या.....त्या काळात वपुंची भेट ! आयुष्याने मला दिलेल्या काही अनमोल नजराण्यांपैकी हा एक !
३ भागांची ही लेखमालिका म्हणजे खरंतर पुन्हा एकदा माझ्या जुन्या डायरीतली पानंच आहेत...
कारण आता नव्याने लिहिलं तर ते कोवळं वेडेपण, ती एक्साइटमेंट जशीच्या तशी उतरणं शक्यच नाही !
वपुंच्या सहवासातला आनंद, आणि.......शेवटी आयुष्यभरासाठी मनाला लागलेला चटका....सगळं जसंच्या तसं इथे ठेवतेय !
vapu.jpg
दोन्ही फोटो जालावरून साभार.
*************************************************************************************************
१९/१०/२०००
"मनोहर, निसर्ग पाहायचाय ? बघ ह्या फुलांकडे."
हो, हेच वपु. स्वागतालाच ही हळव्या फुलांची रांगोळी !
विश्वासच बसत नव्हता.इतके दिवस ज्या व्यक्तीच्या लिखाणाने भारावून गेले, ज्यांच्या जगण्याला मानाचा मुजरा देत आले तेच...तेच वपु आज प्रत्यक्षात समोर होते.
त्यांच्या पुस्तकातून डोकावणारं त्यांचं उमदं, प्रसन्न, खेळकर आणि तरीही सखोल व्यक्तिमत्व प्रत्यक्षात साकार होत होतं.
'पार्टनर' पुस्तकाच्या पहिल्या पानावर वपुंचा फोन नं दिलेला. होस्टेलच्या कॉईन बॉक्सवरनं सकाळी सहजच नंबर फिरवला. अगदी सहज. वाटलंच नव्हतं, वपु ह्या नंबरवर भेटतील म्हणून.
" वपु काळे बोलताय का ? तुम्हाला भेटायचंय."
"ये."
"कधी येऊ ?"
"आज."
"किती वाजता वपु ?"
"संध्याकाळी ५:३०."
बस्स्....अपॉईंटमेण्ट, तीही इतक्या दिग्गजाशी इतकी सोप्पी असू शकते ?
नक्की काय घडणारे ,ह्याचा अंदाज येत नव्हता. पण मी आणि सई अक्षरशः उडत होतो.संध्याकाळी बांद्रा. ५:३० चे ६:३० झाले. वाईट वाटलं,वेळ पाळता आली नाही म्हणून.
फोन केला," वपु, जरा उशीर होतोय."
"या, मी वाट पाहतोय."
दिवाळीची शुभेच्छापत्रं आणि गुलाबाची फुलं घेऊन साहित्यसहवास मध्ये गेलो.
'झपूर्झा' फ्लॅट नं. -११.
दारावर पितळी अक्षरं.." वपु ". तीही अगदी रसिकतेने लिहिलेली.
दुसर्‍या दारावर ' प्लेझर बॉक्स '. चाहत्यांची पत्रं साठवणारा.
नेमप्लेट्च्या वरती आणखी एक पाटी.
" मी तुमच्याच कंपनीच्या वस्तू वापरतो. कृपया सेल्समन किंवा सेल्सगर्ल्सनी आपला वेळ वाया घालवू नये !"
दारापासूनच वपु 'फील' व्हायला लागले !
छोटासा पण अत्यंत रसिक हॉल....येणार्‍यांचं मनापासून स्वागत करणारा.
दार उघडलं त्यांचा मित्र-कम चाहता- मनोहर पेडणेकर ह्यांनी.
" बापू, तुमच्या दोघी अनामिका आल्या !"
अनामिका ? खरंच की. सकाळी फोनवर स्वतःचं नाव तरी कुठे सांगितलं होतं मी ?
आम्ही सोफ्यावर बसलो.
वपु आतून आले......शांत, तृप्त चेहरा. काहीसा स्वतःतच हरवलेला अन् तरीही सगळ्यांत मिसळणारा.
मुद्दाम ठरवून काहीच होत नाही हेच खरं.
आम्ही तिथे जायच्या आधी वेड्यासारखी चर्चा करत बसलो होतो, ' वपुंना नमस्कार आधीच करायचा की येताना ?'
शेवटी ठरलं, निघतानाच करू या वाकून नमस्कार.
आणि तिथे मात्र त्यांना पाहून आपोआपच खाली वाकलो...नकळत !
वपु समोर येऊन बसले तरी अजून घडतंय ते खरंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता.
हॉलच्या मधोमध एक लाकडी टीपॉय.
वपु म्हणाले, " मनोहर, ते सर्कल पूर्ण कर आता."
मनोहर उठले आणि आमच्याशी बोलत-बोलत त्या टीपॉयचा एक कंपोनंट हलवला.
"तुम्ही याल की नाही हे प्रश्नचिन्ह होतं. उत्तर मिळालं. वेव्हलेन्थ जुळली, सर्कल पूर्ण झालं."
वपु...मुजरा !
त्यानंतरचा प्रत्येक क्षण मंतरलेला !
काय बोललो ते आता नीटसं आठवत सुद्धा नाही. पण बर्रच काही, बराच वेळ.
त्यांच्या पुस्तकांमधली आमची आवडती वाक्यं मध्येच आमच्या बोलण्यात आली की, " हं, ते पार्टनरमधलं ना." " सखी मधलं."
मान्य आहे त्यांनीच लिहिली आहेत ही पुस्तकं. पण तरीही हे असं वाक्य न् वाक्य लक्षात कसं राहू शकतं ?
सई आणि मी दोघीही शिवाजीराजे आणि लता साठी वेड्या. राजांना आदर्श मानणार्‍या. त्यात आता हे नवीन वेड आणि आदर्शस्थान म्हणजे- वपु. आमच्या तोंडून आदर्श हा शब्द ऐकून वपु म्हणाले,
" आदर्श आपण जेव्हा ठरवतो तेव्हा त्याची फक्त चांगलीच बाजू आपल्यासमोर असते. फार जवळ गेलं की दुसरी वाईट बाजूसुद्धा दिसायला लागते. मनाला चरा पडला की आदर्श कोसळतो ! "
" डाव्या हाताला कळत नाही की तो डावा आहे आणि उजव्यालाही ते कळत नाही. डावा-उजवा ठरवणारा आतमध्ये तिसरा कुणीतरी आहे् या तिसर्‍याला ओळखा. "
वपुंना विचारलं, " तुम्हाला कोण आवडतं, गायक किंवा कलाकारांमध्ये ?"
" गाणं म्हटलंत तर....लता !"
आम्ही जमिनीच्या दोन बोटं वर ! वॉव ! वपुंनापण लता आवडते.
वपु सांगत होते.
एकदा लताचा फोन आला.
" वपु, मला तुम्हाला भेटायचंय."
मी स्तब्ध.
"हॅलो, वपुच ना?"
" हो."
" मग बोलत का नाही ? काय झालं?"
"प्रत्यक्ष तुमचा फोन आल्यावर कोणालाही जे होईल तेच ! "
अरे, म्हणजे हे असं वेडं होणं वपुंनीही अनुभवलंय तर !
गप्पा पुढे सरकत होत्या. विषय पुरत नव्हते.
वसुंधरेच्या आठवणीने वपुंच्या चेहर्‍यावर अगदी सहज जाणवण्याइतपत व्याकूळ बदल झाले.
"वसुंधरा गेली आणि नंतर किती काळ गद्य लिहिताच येईना. जे लिहिलं ते कवितेतच."
पेडणेकरांनी एक पुस्तक हातात ठेवलं. 'वाट पाहणारे दार' ....वपुंनी वसुंधरेच्या आठवणी लिहिलेलं पुस्तक. सगळं कवितेत.
आम्ही म्हटलं," वपु,तुम्ही वाचून दाखवाल ह्या कविता ?".......किती खुळचट प्रश्न.
" नको, मला त्रास होतो." नजर कुठेतरी खाली.
खूप हललं आत काहीतरी.
"वपु, तुम्ही सुद्धा डिस्टर्ब होता ?"
" अरे, अगदी छोट्याशा गोष्टींनी सुद्धा डिस्टर्ब होतो....कधीकधी तर डिस्टर्ब व्हायला काही नाही म्हणून डिस्टर्ब होतो."
हम्म्म. स्वतः अस्वस्थ होत असल्याशिवाय हे असलं लिखाण कसं उतरणार म्हणा !
वपु, "तुम्ही काय घेणार ?"
"काहीच नको वपु. आमचं पोट भरलं. खरंच काही नको."
" पाणीपुरी चालेल?"
" पाणीपुरी?"
" बसा. आलोच मी."
चेंज करून वपु आले. "चला."
आम्ही खुळावल्यासारख्या त्यांच्यामागोमाग बिल्डींगच्या बाहेर.
कलानगरच्या रस्त्यावर वपुंसोबत चालत होतो आम्ही. म्हणजे पाय चालत होते...आम्ही हवेत उडत होतो !
कोपर्‍यावरच्या भेळवाल्याकडे पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाताना माझी नेहमीची त्रेधातिरपीट. आई लहानपणी म्हणायची मला, " केवढेसे घास घेतेस गं ? अन्ननलिका लहानच राहिलीये वाटतं तुझी." मी वैतागायचे.
पण पाणीपुरी खाताना मात्र मला तिचं म्हणणं खरंच होतं की काय असं वाटतं. तोडून खाता येत नाही आणि आख्खी गिळता येत नाही.
वपु आणि सई मात्र एकदम मजेत पाणीपुरीची मजा घेत होते.
घरी परत आलो. बराच उशीर झाला होता. निघायला हवं होतं.
"वपु, आम्ही निघतो.खरंतर उठवत नाहीये इथून."
"उशीर झालाय ? बरं,पुन्हा या. केव्हाही."
आम्ही जिना उतरून खाली जाईपर्यंत वपु दारात उभे. अगदी घरच्या व्यक्तींसाठी थांबावे तसे. हात हलवून निरोप देत उभे होते.
आम्ही कलानगरच्या रस्त्यावरून भारल्यासारख्या चालत होतो....दोघीही नि:शब्द !
पुढच्या भेटीची स्वप्नं बघत ......

PMS...अर्थात- प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम !

" किती जोरात बोलतोस ? जरा हळू बोल."
......"अरेच्चा, कमाल आहे तुझी. मी नेहमीसारखाच बोलतोय. तुलाच मोठ्याने ऐकू येतंय."
" प्लीज मला त्रास देऊ नका. का सगळे मला छळायला टपलेत ?"
......नवरा हतबल. आणि मुलांचे गोंधळलेले, दुखावलेले प्रश्नांकित चेहरे. "आई असं का करतेय ?"
" माझ्या हातून काहीच होणं शक्य नाही. मी काहीही करायच्या लायकीची नाही."
....उच्चशिक्षित, जबाबदार पदावर असलेल्या समर्थ स्त्रीच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्यं....टिपिकली मासिकपाळी यायच्या आधीच्या दिवसांतली.
हे सगळं ती बोलत होती, ह्यावर पाळी येऊन गेल्यावर तिचा स्वतःचाच विश्वास बसणार नाही.
हा लेख वाचत असणार्‍यांपैकी कित्येक जणींनी ही परिस्थिती स्वतः अनुभवली असेल.
मासिक पाळीच्या आधी होणार्‍या ह्या त्रासाची PMS ह्या नावाने बर्‍याच जणींना ओळखही असेल.
पण हे प्रकरण नेमकं आहे काय ? का होतो हा त्रास ? सगळ्याच स्त्रियांना होत असेल कि काहीजणींनाच ? ह्यातून काही गंभीर तर नाही ना उद्भवणार ? सगळ्यांत महत्वाचं म्हणजे....ह्यावर काही उपाय ?
PMS....अर्थात प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम ह्याची सोप्या भाषेतील व्याख्या अशी करता येईल.
" मासिक पाळीच्या साधारणपणे दोन आठवडे आधीपासून होणारे त्रासदायक शारीरिक आणि मानसिक बदल."
वैद्यकीय भाषेत सांगायचं तर...
" PMS is a condition which manifests with distressing physical, behavioural & psychological symptoms, in the absence of organic or underlying psychiatric disease, which regularly recurs during the luteal phase of each menstrual cycle & which disappears or significantly regresses by the end of menstruation."
ह्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे.
थोडेफार शारीरिक बदल जवळजवळ ८०-९० % स्त्रियांमध्ये होतात. पण त्यांच्या दैंनदिन आयुष्यात त्यामुळे फारसा अडथळा येत नाही.
साधारणपणे २०-३०% स्त्रियांना हा त्रास जास्त होतो....म्हणजेच त्यांच्या ' क्वालिटी ऑफ लाईफ ' वर विपरीत परिणाम होण्याइतका !
PMS चे प्रकार ----
१. सौम्य (Mild) - ह्या बदलांमुळे वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यात कसलाही व्यत्यय येत नाही.
२. साधारण (Moderate) - ह्या बदलांमुळे वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यात व्यत्यय येतात. पण तरीही ती स्त्री आपली कामं उरकू शकते, लोकांमध्ये मिसळू शकते.(Suboptimal functioning)
३.तीव्र (Severe) - ह्या स्त्रिया ह्या दिवसांमध्ये वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक आयुष्य हाताळू शकत नाहीत. ह्या सगळ्यातून अंग काढून घेतात. (withdrawl)
४. प्रिमेन्स्ट्रुअल एक्झॅजरेशन / मेन्स्ट्रुअल मॅग्निफिकेशन - ह्यामध्ये मुळातच काहीतरी मानसिक आजार असू शकतो, ज्याची लक्षणं ल्युटिअल फेजमध्ये वाढतात, आणि ही लक्षणे पाळी संपल्यानंतरही पूर्णपणे नाहीशी होत नाहीत.
५. PMDD (Premenstrual dysphoric diosrder) - हे PMS चे आणखी तीव्र स्वरूप. ह्याचा संबंध गुणसूत्रांशी आढ्ळून आला आहे. साधारण ५-६ % स्त्रियांमध्ये हे तीव्र स्वरुप दिसून येतं.
नेमकं घडतं काय ?
वर एवढ्या ठिकाणी 'शारीरिक आणि मानसिक लक्षणे' हा शब्द आला आहे.
काय असतात PMS ची लक्षणे ?
अ. शारीरिक बदल-
१. ओटीपोट गच्च झाल्यासारखं वाटणे (ब्लोटिंग)
२. स्तनांमध्ये जडपणा वाटणे, दुखणे
३. चेहर्‍यावर पिम्पल्स येणे
४. घट्ट शौच
५. वजनात वाढ
६. शरीरावर सूज येणे
७. अतिभूक लागणे किंवा भूक न लागणे
८. थकवा येणे
९. झोप न लागणे किंवा सारखं झोपावंसं वाटणे
१०. डोकेदुखी
ब. मानसिक बदल-
१. उगीचच रडू येणे
२. अस्वस्थ, निराश, हताश वाटणे
३. चिडचिड होणे
४. अति हळवं होणे
५. मनस्थितीत टोकाचे बदल होणे
६. कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करता न येणे
६. आत्महत्येचे विचार मनात येणे
एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की स्त्रियांमधील अपघातांचं, आत्महत्येचं, किंवा गुन्ह्यांचं प्रमाण ल्युटिअल फेजमध्ये जास्त असतं.
हा घडतं हे सगळं ?
१९३१ मध्ये अमेरिकेतील स्त्रीरोगतज्ञ- डॉ..फ्रँक आणि डॉ. हॉर्नी ह्यांनी पहिल्यांदा ह्या आजाराचा एक खराखुरा आजार असा उल्लेख केला. ( त्यांना मनापासून धन्यवाद ! )
त्याआधी ह्या लक्षणांकडे कोणीच गंभीरपणे पहात नव्हतं.
(अर्थात अजूनही कित्येक लोक ह्या आजाराकडे 'बायकांच्या विनाकारण आणि नेहमीच्या तक्रारी' अशाच नजरेने बघतात!)
ह्या सगळ्या बदलांचा ट्रिगर म्हणजे ओव्ह्युलेशन !
( ओव्ह्युलेशन म्हणजे बीजांडातून बीज बाहेर पडण्याची प्रक्रिया, ही साधारणपणे पाळी यायच्या १४ दिवस अगोदर घडते.
पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते ओव्ह्युलेशनपर्यंतच्या काळाला फॉलिक्युलर फेज म्हणतात आणि ओव्युलेशन ते पुन्हा पाळी चालू होण्याच्या काळाला ल्युटीअल फेज म्हणतात.)
ओव्ह्युलेशननंतर शरिरात होणार्‍या हॉर्मोनल बदलांमुळे ( आणि त्यासोबतच होणार्‍या मेंदूतील सिरोटोनिन नावाच्या न्युरोट्रान्समिटरच्या पातळीतील बदलामुळे ) PMS ची लक्षणे चालू होतात.
तसेच PMS चा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये बीटा-एण्डॉर्फिन्स ह्या न्युरोट्रान्समिटर्सची पातळी कमी असते, असं एका संशोधनात आढळून आले आहे.
बाकी काही थेअरींवर अजून संशोधन चालू आहे.
उदा.- १. जीवनसत्वांची कमतरता
२. थायरॉईडचे आजार
३. पर्सनॅलिटी फॅक्टर्स
PMS चे निदान --
रक्तातील साखरेची पातळी मोजली की मधुमेहाचं निदान करता येतं तसं PMS चं निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत करता येणारी कुठलीही ठोस चाचणी नाही !
ह्या आजाराचं निदान करण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे लक्षणांची नोंद. ( Symptom Diary )
तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक जे काही बदल जाणवतील त्याची रोजच्या रोज नोंद करून ठेवायची. साधारणपणे २-३ महिने अशी नोंद केल्यावर ह्या लक्षणांचा ठराविक पॅटर्न,तसेच ह्यातील ठळक लक्षण समजून येते. त्यावरून हा आजार नक्की PMS च आहे का, आणि असेल तर किती तीव्र स्वरुपाचा आहे, हे ठरवता येतं.
PMS सारखीच लक्षणे असलेले काही आजार-
१. नैराश्य
२. हायपोथायरॉईड
३. अ‍ॅनिमिया ( रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे )
४. मायग्रेन
मग ह्यापासून PMS वेगळा कसा ओळखणार ?
PMS चं वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी लक्षणे पाळी चालू झाल्यावर नाहीशी होतात आणि पुढचे किमान दोन आठवडे लक्षणरहित जातात. असं होत नसेल तर हा वेगळा आजार असण्याची शक्यता जास्त !
अशावेळी लवकरात लवकर संबंधित तपासण्या करून घ्यायला हव्या.
PMS वर उपाय काय ?
PMS बरा करणारा किंवा त्याचं समूळ उच्चाटन वगैरे करणारा काहीच उपाय अजून सापडलेला नाही !
पण तो आटोक्यात रहावा किंवा त्याची तीव्रता कमी करता यावी म्हणून उपाययोजना नक्कीच करता येते.
१. आहार-विहारातील बदल---
ज्या काळात ही लक्षणे जाणवतात, त्या काळात आहारातील काही बदलांमुळे बरीच मदत होते.
१. मीठाचे ( आणि खारवलेल्या पदार्थांचे ) प्रमाण कमी करा.
२. एकावेळी पोटास तड लागेल इतकं खाण्यापेक्षा थोडं थोडं विभागून खा.
३. जंक फूड टाळून फळं आणि भाज्यांचा जास्त वापर करा.
४. कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा वापर वाढवा किंवा/आणि कॅल्शिअमचे सप्लीमेंटस घ्या.
५. कॉफी आणि अल्कोहोल शक्यतो टाळा किंवा मर्यादित प्रमाणात घ्या.
६. तंतुयुक्त पदार्थांचा आहारात वापर वाढवा.
७.मल्टिविटामिन ( विशेषतः विटामिन- बी-6 ), मॅग्नेशिअम चे पूरक डोस घ्या.
८. ई-जीवनसत्वाचे पूरक डोस घ्या.
२. व्यायाम--
आहाराइतकाच महत्वाचा आहे व्यायाम.
( इथेही आलाच का व्यायाम ? " कुठे जाशी भोगा, तर तुझ्यापुढे उभा ! डोळा मारा )
पोहणे, सायकल चालवणे, चालणे किंवा एरोबिक व्यायाम ह्या सगळ्याचा फायदा होतो.
नेमकं काय घडतं व्यायाम केल्याने ?
आधी उल्लेख केल्याप्रमाणे PMS चा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये बीटा-एण्डॉर्फिन्स ह्या न्युरोट्रान्समिटर्सची पातळी कमी असते.
व्यायाम केल्याने शरीरामध्ये पुरेसे बीटा-एण्डॉर्फिन्स तयार होतात. त्यामुळे मनस्थिती प्रसन्न रहाण्यास मदत होते.
३. ताण-तणाव कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम करा.
४.आवडीच्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. जबाबदारीची किंवा खूप कार्यक्षमता लागणारी कामे ( उदा.- ठरवून करण्याजोगा एखादा समारंभ, मिटींग ) शक्य असल्यास ल्युटिअल फेजच्या आधी ठेवा.
५.औषधोपचार--
ओव्ह्युलेशन हा जर ट्रिगर फॅक्टर म्हणून सर्वमान्य झाला आहे तर ओव्ह्युलेशन होऊ न देणे हा अर्थातच ह्या आजारावरचा लॉजिकल उपाय म्हणून वापरला जातो आणि त्याचा बर्‍याच स्त्रियांना उपयोग होतो.
गर्भनिरोधक गोळ्या वापरत असताना ओव्ह्युलेशन होत नाही. उदा.- ओवराल-जी, नोवेलॉन, फेमिलॉन.
ह्या प्रकारच्या गोळ्यांनी काही जणींना मळमळ, डोकेदुखी, वजन वाढणे असे त्रास होऊ शकतात.
नवीन ' यास्मिन ' नावाच्या ज्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्यांच्यामुळे हे दुष्परिणाम होत नाहीत.
यास्मिनमुळे होणार्‍या दुष्परिणामांविषयी बर्‍याच उलटसुलट चर्चा होतात. पण स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार्‍या जागतिक संस्था ह्या आजारासाठी यास्मिन रेकमेंड करतात.
-- इस्ट्रोजेन पॅचेस हासुद्धा PMS वरील एक उपाय म्हणून वापरला जातो.
( गर्भाशय काढलेलं नसेल तर नुसते इस्ट्रोजेन पॅचेस वापरल्यास गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे हे पॅचेस प्रोजेस्टेरॉन ह्या हॉर्मोनसोबतच आणि अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानेच वापरावेत.)
-- डॅनॅझॉल, सुप्रिफॅक्ट अशा नावाची काही औषधे ह्या आजारावर वापरली जातात. पण ह्यांचेही काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
-- स्तनांचे दुखणे, पोटात कळ येणे ह्यासाठी वेदनाशामक औषधे वापरली जातात.
अ‍ॅण्टिडिप्रेसन्टस्--
PMS वरील उपचारांमध्ये ह्या औषधांचा मोठ्ठा सहभाग आहे. अगदी कॉमनली वापरलं जाणारं औषध म्हणजे- फ्लुओक्झेटिन (Fluoxetine)
ह्या औषधाचं काम म्हणजे शरीरातील सिरोटिनिनची पातळी टिकवून ठेवणे.
( वर वाचलेलं आठवलं का ? सिरोटोनिनची पातळी कमी असलेल्या स्त्रियांमध्ये PMS ची लक्षणे जास्त दिसून येतात.)
ही औषधे बर्‍याचदा पाळीच्या आधीचे दोन आठवडे घेण्यासाठी दिली जातात.
सलग पूर्ण महिनाभर घेण्यासाठी दिली असतील तर बंद करताना एकदम बंद करू नयेत. असं केल्याने सगळी लक्षणे रिबाऊंड होण्याची शक्यता असते.
६. शस्त्रक्रिया--
जेव्हा वरील सगळे उपाय करूनही त्रास होत राहतो, तेव्हा हा शेवटचा पर्याय म्हणून विचारात घेतला जातो.
( असं खूप कमी वेळा होतं. त्यामुळे घाबरू नका ! )
ह्यामध्ये गर्भाशय आणि दोन्ही ओवरी काढून टाकल्या जातात.
शस्त्रक्रिया करण्याच्या आधी काही विशिष्ट औषधांनी कृत्रिम मेनोपॉज घडवून आणला जातो. त्यामुळे शस्त्रक्रियेचा फायदा होईल की नाही ह्याची चाचणी घेता येते.
सगळ्यात शेवटी आणि महत्वाचं .....PMS चा त्रास आहे म्हणून त्याच्यामुळे आणखी काही गंभीर शारीरिक आजार उद्भवत नाही.
औषधोपचार केले तर PMS आटोक्यात राहू शकतो !
...... मग पुढच्या महिन्यात PMS ची लक्षणं दिसायला लागली की ?........
होठ घुमा, सिटी बजा, सिटी बजा के बोल....भैय्या ( मैय्या !) ऑल इज वेल !!!
____ डॉ. प्रज्ञा कुट्टे ( स्त्रीरोगतज्ञ )
******************************************************************************************************
डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश पी. एम. एस. ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते डॉक्टरी सल्ल्यानुसारच करावेत.